गुरुकुल ही एक पारंपारिक शाळा न बनता. शिक्षण क्षेत्रातील एक संशोधन प्रकल्प व्हावा या दृष्टिकोनातून भविष्यातील कार्याची दिशा असेल. शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करुन सद्य भारतीय शिक्षण व्यवस्था उत्तमतेकडे कशी घेऊन जाता येईल याचे संशोधन केले जाईल. या संशोधनातून शिक्षणाचा उत्तम नमुना तैयार व्हावा हे ध्येय राहिल. हा नमुना फक्त गुरुकुलापुरता मर्यादित न बनता, भारता मधील 60 ते 70% भागात असलेल्या ग्रामीण भागाला उपयुक्त नमुने या संशोधनातून समोर येवोत.

शिकवण्यापेक्षा विद्यार्थ्यांसाठी शिकण्यानुकूल वातावरण तयार करणे हे शिक्षणासमोरचे अवाहन आहे. केवळ शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन विद्यार्थ्यांचा विकास होत नाही. त्या साठी विद्यार्थ्यांमधील ज्ञानाची भूक जागवणे हे खरे काम आहे. विद्यार्थ्याला स्वत:हून शिकावे वाटेल अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी समस्येच्या मुळापर्यंत जाऊन पर्यायाची रचना विकसित करण्याची अवश्यकता आहे.

सध्याच्या शिक्षण प्रकियेमध्ये ‘मनाचा विकास’ ही सुटलेली कडी (Missing Link) आहे. त्यामुळे व्यक्तिगत, सामाजिक व राष्ट्रीय या स्थरांवर विविध समस्या उद्भवत आहेत. याला उत्तर शोधन्याचा प्रयत्न गुरुकुलात करत आहोत व करत राहयचा आहे. अभ्यासाअंती असे लक्षात आले आहे की अध्यात्म व विज्ञान यांची जोड असल्याशिवाय शिक्षणास पूर्णत्व येणार नाही. म्हणून या दोन्हींचा मेळ शिक्षणात घालवायचा आहे. शिक्षण व्यवस्थेमधील उदासीनता घालवणे व शिक्षकांचा विकास करणे या दोन महत्वाच्या गरजा आहेत. या दृष्टीने अधिक परिश्रम व संशोधन होणे अती महत्वाचे आहे.