रज्जाक पठान

2006-2007 पासून सोनदरा गुरुकुलात शिक्षक-कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे. खरे तर आतापर्यंत शिक्षक म्हणून शिकवण्यापेक्षा मी स्वत:च खूप काही शिकलो आहे आणि शिकतच राहील.

रोज काहीतरी नवीन करावे असा आग्रह गुरुकुलात धरला जातो. इतरांचे अनुकरण करण्यापेक्षा स्वत:च नवनवीन प्रयोग करण्यावर अधिक भर असतो. पारंपारिक शिक्षणाला फास देवून विज्ञान आणि अध्यात्म याचा सुरेख संगम करुन चारित्र्य संपन्न विद्यार्थी व शिक्षक कार्यकर्ते घडवण्याचे कार्य गुरुकुलात केले जाते. यातून माझा विकास होताना दिसत आहे.

गुरुकुलात विद्यार्थी व कार्यकर्ते यांचे 24 तास सहजीवन आहे. यामुळे कौटुंबिक संबंध निर्माण होतात. विद्यार्थी येणार्या सर्व प्रकारच्या समस्या मोकळेपणाने मांडतात. त्यामुळे आनंदादायी वातावरण राहण्यास मदत होते. विद्यार्थ्यांना आम्ही गुरुकुलातील छोट्या छोट्या जाबदार्‍या देतो. या मुळे विद्यार्थ्यांचा व्यवस्थापनात सहभाग असतो. यामुळे त्यांच्यातील नेतृत्व गुण विकसित होतो. जबादारीची जाणीव येते.

कार्यकर्त्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा उपक्रम म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला 10 दिवसांची दीर्घ बैठक वजा कार्यशाळा. या कार्यशाळेमध्ये सर्व कार्यकर्ते सामील असतात. वर्षभर काय व कसे करायचे याचे स्मार्ट प्लॅनिंग सहविचार पद्धतीने केला जातो. त्यामुळे कामात सुलभता येते. याच बरोबर आमचा विकास होण्याच्या दृष्टीने विविध सत्रांचे आयोजन देखील केलेले असते.

विद्यार्थ्यांना शिकवण्या पेक्षा आम्ही शिकायला अधिक प्रवृत्त करतो. वेगवेगळे अभ्यास पुरक उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना कृतीशील व आनंददायी शिक्षण देण्यावर भर असतो. शिक्षक म्हणून गुरुकुलात माझी भूमिका ही विद्यार्थी सहाय्यक व मार्गदर्शकाची असते. यामुळे विद्यार्थ्याने स्वंअध्ययन करावे यावर भर अधिक असतो. आम्ही चालना देण्याचे काम करतो.

प्रमाणिकपणा, उत्तमता, नियोजन, प्रयोगशीलता, निरंतरता, निरामयता, स्वीकरशीलता, सुसंवाद, पूर्णता, समजपूर्वक कृती ही 10 मूल्ये गुरुकुलाचा पाया आहेत. दैनंदिन काम करताना ही मूल्ये मार्गदर्शक ठरतात. अशा या गुरुकुलात फक्त कार्यकर्ते व विद्यार्थीच घडत नाहीत तर एक उत्तम शिक्षण पद्धत घडत आहे.

अशा एक संशोधन केंद्राचा, राष्ट्रीय कार्य करणार्‍या संस्थेचा मी एक घटक आहे. या महान कार्यात माझा छोटासा का होईना पण हातभार लागत आहे. याचा मला अभिमान आहे. मी आनंदाने गुरुकुलात काम करत आहे. आयुष्यभर मला असे काम करायला आवडेल.

सौ. सुवर्णा पवार

सन 2007 पासुन गुरुकुलामध्ये कार्य करण्याची संधी मिळाली. ही एक सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. कारण इथे विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक कार्यकर्त्यांचा देखील विकासाचे कार्य चालू आहे. कार्यकर्ता म्हणून राहत असताना आपण एक गुरुकुल परिवाराचे सदस्य आहोत याचा मात्र नक्कीच अभिमान वाटत आहे.

‘सहविचार पद्धती’ हे गुरुकुल परिवाराचे वैशिष्ट्य आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षभारातील व्यवस्थांचे वाटप व कोणती कामं कशी करायची आहेत यांचे स्मार्ट नियोजन सहविचार पद्धतीने केले जाते. प्रत्येक वर्षी नव्या योजना नवीन कार्य पद्धती अवलंबिली जाते. ही रचना ठरत असताना प्रत्येकाच्या मतांना प्राधान्य व मान्यता दिली जाते. त्यामुळे सहजतेने सर्वजण जाबाबदारी स्वीकारतात व आनंदाने पार पाडतात.

विज्ञान विषय अध्यापन करत असताना अनेक संधी येथे उपलब्ध झाल्या. अद्ययावत प्रयोगशाळा, प्रत्येक मुलाला प्रयोग करण्याची संधी, शालाबाह्य अवांतर प्रयोग, विज्ञान प्रदर्शनी, अध्यापनात प्रयोगशीलता व नवनवे प्रयोग यातून मुलांना आनांददायी शिक्षण खर्‍या अर्थाने मिळते.

लक्ष्मण बापूराव आर्दड

सोनदरा गुरुकुलात मी कार्यकर्ता म्हणून जून 2011 पासून कार्यरत आहे. गुरुकुलत दिनचर्या, उपक्रम, कार्यक्रम, या मध्ये नव निर्मिती असते. अध्यापनात देखील कंटाळा येणारी पद्धती न ठेवता प्रयोगशीलता आनण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

गुरुकुलात सर्वात महत्वाचे जाणवले ते म्हणजे प्रामाणिकपणाला महत्व आहे. गुरुकुलात येण्यापूर्वी जीवन जगण्याबाबतचा मर्यादित दृष्टिकोन होता. तो गुरुकुलाने व्यापक बनविला आहे. पैसा मिळवणे एवढेच मर्यादित ध्येय नाही तर जीवनात आनंद मिळवण्यासाठी मानवाचा जन्म आहे. हे Happy Thoughts च्या माध्यमातून गुरुकुलात ज्ञात झाले.

गुरुकुलात कार्यकर्त्यांची टीम चांगली आसल्यामुळे गुरुकुलातील दैनंदिन कामकाज सुरुळीत व ताणविरहीत असते. काका, बापूंचे नेतृत्व खूप छान असते. गुरुकुलात विद्यार्थी घडविण्या बरोबरच कार्यकर्ता देखील विकसित झाला पाहीजे ही बाब मला आवडली. तसेच गुरुकुलाला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य येथील सर्व सुविधा खूप आवडल्या आहेत.